मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकारी यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे. याशिवाय मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाऊ शकते.

विवेक फणसळकर यांनी ३० जून २०२२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची शक्यता धूसर असल्यामुळे ३० एप्रिलला ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सदानंद दाते व संजयकुमार वर्मा दोघेही १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. फणसळकर यांच्यानंतर दाते व वर्मा वरिष्ठ अधिकारी आहेत. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) सध्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सुरू असल्यामुळे दाते यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे वर्मा यांना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यताही फार कमी दिसत आहे. त्यांच्यानंतर रितेश कुमार, अमिताभ गुप्ता व संजीवकुमार सिंघल हे १९९२च्या तुकडीचे अधिकारीही या शर्यतीत आहेत. या तिघांमध्ये रितेश कुमार बाजी मारू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, सरकारला या पदावर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल तर १९९३ तुकडीच्या अर्चना त्यागी हा एकमेव पर्याय आहे. त्याचप्रमाणे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. फणसळकर यांच्या निवृत्तीपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झाला नाही, तर अतिरिक्त कार्यभार देवेन भारती यांना सुपूर्द केला जाऊ शकतो.