मुंबई : मुंबई पत्तन (बंदर) प्राधिकरणाने मुंबईतील २७ आणि अलिबागमधील एक असे एकूण २८ भूखंड ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. हे २८ भूखंडांचे क्षेत्रफळ २१७ एकर इतके आहेत. या भूखंडांचा व्यावसायिक आणि औद्योगिकविषयक वापर करता येणार आहे. तर हे भूखंड भाडेतत्वावर दिल्यास मुंबई पत्तन प्राधिकरणास वर्षाला ८१४ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेशात मुंबई पत्तन प्राधिकरणाच्या मोठ्या प्रमाणावर जागा आहेत. या जागांपैकी मुंबईतील २७ आणि अलिबागमधील एक भूखंड ३० वर्षे भाडेतत्वावर देण्यासाठी मुंबई पत्तन प्राधिकरणाने सोमवारी स्वारस्य निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार वडाळ्यातील ५९.३४ एकर, शिवडीतील ७४,८९ एकर, काॅटन ग्रीनमधील २१.०३ एकर, पी. डीमेलो रोड येथील ०.४८ एकर, कुलाबा येथील ०.११ एकर, आरएम बिल्डींग फोर्ट येथील २९२१.३३ वर्ग मीटर. डीसीटी, माझगाव येथील ५४.३६ एकर, थल नाॅब, अलिबागमधील ४.७९ एकर, ससून डाॅक येथील २.७२एकर आणि मॅलेट बंदर येथील ०.२५८ एकर अशा एकूण २१७ एकरचे भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. मुंबईतील २७, तर अलिबागमधील एका भूखंडाचा यात समावेश आहे. तर व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच या भूखंडाचा वापर करता येणार आहे. तर ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान स्वारस्य निविदा सादर करता येणार आहेत.
मुंबई पत्तन प्राधिकरणाच्या जागा खुल्या आहेत. त्यामुळे या जागा भाड्याने देऊन त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई पत्तन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली. हे भूखंड भाडेतत्वावर दिल्याने प्राधिकरणाला दरवर्षी ८१४ कोटी रुपये मिळतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.