मुंबई : चर्चगेट येथील आयकर कार्यालयानजिक महर्षी कर्वे मार्गावर गेल्या महिनाभरापासून वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवासी, वाहनचालक संतप्त झाले असून प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, प्रवाशांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहेत. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून खड्डे बुजविण्यासाठी निविदा मागवून कंत्राट दिले जाते. मात्र, यंदा एप्रिलऐवजी मे महिन्यात या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामांना पालिकेकडून उशिरा सुरुवात झाली.
दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर पालिकेने भर दिला असला तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने निदर्शनास येत आहे. चर्चगेट येथील आयकर कार्यालयाजवळील महर्षी कर्वे मार्गावर एक मोठा खड्डा पडला आहे. गेल्या महिनाभरापासून हा खड्डा जैसे थे असून अद्यापही पालिकेचे त्याकडे लक्ष गेलेले नाही.
परिणामी, वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. संबंधित रस्ता मुंबई महापालिकेच्या केंद्रीय रस्ते विभागाच्या अखत्यारित येतो. पालिकेचे विभाग ए, बी, सी आणि डी या भागांमध्ये रस्ते कामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कामांची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते संतोष दवंडकर यांनी व्यक्त केली.
संबंधित खड्डा फार मोठा असून गेल्या महिन्याभरापासून जैसे थे आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या खड्ड्यामुळे शासकीय गाड्या, शाळेच्या बस, खासगी वाहनांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, यापूर्वी अनेक वेळा दुचाकींचे अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चर्चगेट – चर्नी रोडदरम्यान महर्षी कर्वे मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. रस्त्यांची योग्यरीत्या दुरुस्ती करण्यात आली नसल्याचेही दवंडकर यांनी सांगितले.
संबंधित रस्त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित खड्ड्यांची वेळीच दुरुस्ती का करण्यात आली नाही, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.