मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार दिल्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे (शिंदे गटाचे) माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हिंदी आणि मराठी ‘सामना’ वृत्तपत्राच्या ८ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या आवृत्त्यांच्या वृत्तपत्रकारांना समन्स बजावण्याची विनंती करणारा अर्ज शेवाळे यांनी विशेष न्यायालयाकडे केला होता. तथापि, सामना कार्यालयात दत्ता हरगुडे नावाच्या एका व्यक्तीला हे समन्स प्राप्त झाले. त्यानंतर दोन अर्ज दाखल करण्यात आले. त्यात हरगुडे यांना समन्स बजावण्याची आणि काही संबंधित कागदपत्रे सादर करण्याची विनंती करण्यात आली. परंतु, शेवाळे हे हरगुडे यांच्यामार्फत सादर करू इच्छित असलेली कागदपत्रे ही त्यांच्याविरोधात जाणारी आहेत. त्यामुळे ठाकरे आणि राऊत यांना न्यायालयात ही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाऊ शकत नसल्याचे नमूद करून सत्र न्यायालयाने १९ जुलै २०२५ रोजी शेवाळे यांचा अर्ज फेटाळला होता.

या निर्णयाला शेवाळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयात सादर करण्यासाठी सांगितलेली कागदपत्रे आपल्याविरोधातील नाहीत. तसेच, ती कागदपत्रे ठाकरे आणि राऊत यांच्याविरुद्ध खटला सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम पुरावा असल्याचे विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळताना विचारात घेतले नाही, असा दावा शेवाळे यांनी याचिकेत केला आहे.

प्रकरण काय ?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार राहुल शेवाळे हेही शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर, २९ डिसेंबर २०२२ रोजीच्या ‘सामना’च्या मराठी आणि हिंदी आवृत्तीत शेवाळे यांच्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात, शेवाळे यांचा दुबई आणि पाकिस्तानातील कराची येथे बांधकाम क्षेत्राशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. शेवाळे यांनी या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारी २०२३ रोजी वृत्तपत्राला नोटीस पाठवून वृत्ताच्या स्रोताबाबत विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त लिहिल्याचा प्रतिसाद देण्यात आला. या प्रतिसादानंतर शेवाळे यांनी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी मानहानीची फौजदारी तक्रार नोंदवली होती.