दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून खोळंबली आहे. रेल्वे परीक्षेतील गोंधळाविरोधात या विद्यार्थ्यांनी रेल रोकोचे अस्त्र उगारले आहे.

पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतले जात होते. पण आता त्यासाठी २० टक्के इतका कोटा ठरवला गेला आहे. शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतील संधी कमी झाल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे. नेमक्या काय आहेत, या विद्यार्थ्यांच्या मागण्या याचा घेतलेला हा आढावा….

१. २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.

२. रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे.

३. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वे सेवेत समाविष्ट करणे आणि भविष्यातही नियम लागू ठेवावे.

४. रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची वन टाइम सेटलमेंट.

५. एका महिन्याच्या आत रेल्वे सेवेत समाविष्ट झालेच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागू करु नये.