भर दुपारी तीन वाजताच मुंबई परिसरात अंधारून आले व काही दिवसांपूर्वी पावसाने केलेल्या हाहाकाराची आठवण होऊन दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते काही काळासाठी निर्मनुष्य झाले. संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी आल्या. मात्र या सरी पटकन ओसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारीही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून रविवारी व सोमवारी राज्यात सर्वच ठिकाणी पावसाचा प्रभाव वाढेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पावसाळ्यात २९ ऑगस्ट आणि १९ सप्टेंबरची पूरस्थिती व पावसाच्या हलक्या सरींनंतर एलफिन्स्टन पुलावर झालेली चेंगराचेंगरी यांचा भीषण अनुभव गाठी असलेल्या मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका शुक्रवारी दुपारी सुरू झालेल्या सरींनी चुकवला. आभाळात ढगांनी गर्दी केल्यावर भर दुपारी संध्याकाळ अवतरली आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी आल्या. मलबार हिल, गिरगाव, दादर, परळ या भागांत अवघ्या १५ मिनिटांमध्ये सुमारे २० ते ३० मिमी पाऊस पडला. बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांत त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. ठाणे व नवी मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी आल्या. मात्र पंधरा मिनिटांत सरींचा वेग त्यानंतर मंदावला. मात्र संध्याकाळी घरी जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.

पालघरमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पालघरमध्ये तिघांचे बळी घेतले. वीज पडून  पालघर येथे वसंत पाटील, मनोर येथे एकनाथ शेलार आणि विक्रमगढ येथे संगिता सुतार यांचा मृत्यू झाला. तर  इतर १४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत महालक्ष्मी येथे प्रविण जाधव (२९ वर्षे) या तरुणाचा अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.

स्कायमेट या संस्थेने शुक्रवारी मुंबईत पावसाची शक्यता वर्तवली आहे. ८ आणि ९ ऑक्टोबररोजी पावसाचे प्रमाण वाढू शकते असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मात्र अतिवृष्टीचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

PHOTO: नभ दाटून आले!

दरम्यान, राज्यात गेल्या चार महिन्यांत पावसाने १०० टक्के कामगिरी केली असून कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक तर विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस पडला. देशभरात सरासरीच्या ९५ ते ९६ टक्के पाऊस झाला असून, मोसमी वाऱ्यांनी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.