मुंबई : मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस पडला. यंदा पावसाळा लवकर सुरू झाला असला तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत कमी पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून आढळून आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला होता. दरम्यान, यंदा मुंबईत पाऊस कमी पडलेला असला तरी धरणक्षेत्रात धोधो पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत मुंबईत सुमारे २२०० मिमि पाऊस पडतो. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कुलाबा येथे २०९५ मिमी वार्षिक पावसाची सरासरी असते, तर सांताक्रूझ येथे २३१९ मिमी इतकी पावसाची वार्षिक सरासरी आहे. मुंबईत यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या दोन महिन्यांत मुंबई वार्षिक सरासरीच्या ३२.५० टक्के पाऊस पडला आहे. त्यात कुलाबा केंद्रावर आतापर्यंत ७३२ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे ७९५ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्यावर्षी जुलैच्या पंधरवड्यापर्यंत कुलाबा केंद्रावर ५७ टक्के पावसाची नोंद झाली होती. तर सांताक्रूझ केंद्रावर ५४ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा मुंबईत कमी पाऊस पडला आहे.
.केंद्र वार्षिक सरासरी पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस आतापर्यंत पाऊस
कुलाबा – २०९५मिमी – १२०२ मिमी (५७.३८ टक्के) ७३२.८ मिमी (३४.९८टक्के)
सांताक्रूझ – २३१९ मिमी – १२६४ मिमी (५४.५१ टक्के) ७९५ मिमी (३४.३१ टक्के)
धरणक्षेत्रात मात्र धोधो
मुंबईत पाऊस कमी पडलेला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीहून जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये १७ जुलै रोजी ८०.९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत धरणांमधील पाणीसाठा फक्त ३७ टक्के होता.
धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती
धरण – पाणीसाठा
प्पर वैतरणा – ७६.४२ टक्के
मोडकसागर – १०० टक्के
तानसा – ९०.३७ टक्के
मध्य वैतरणा – ९१.८७ टक्के
भातसा – ७५.५३ टक्के
विहार – ५२.५८ टक्के
तुळशी – ५३.१४ टक्के
एकूण – ८०.९६ टक्के
मुंबई हद्दीतील जलाशयात कमी पाणी
धरणांतील जलसाठ्यात भरघोस वाढ झाली असून सातपैकी पाच जलाशयांत ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मात्र यंदा मुंबईत कमी पाऊस पडल्यामुळे मुंबईच्या हद्दीतील तुळशी व विहार ही धरणे जेमतेम ५० टक्के भरली आहेत. अजून पावसाचे दोन – तीन महिने शिल्लक असून धरणे भरण्यास अद्याप अवधी आहे.