मुंबई : मुंबईत १ ते १४ ऑगस्टदरम्यान केवळ १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात कुलाब्यात ४८२.१ मिमी, तर सांताक्रूझमध्ये ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, यंदा १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत कुलाबा केंद्रात ५३.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ४९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रांवर मिळून केवळ १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. मात्र पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. मागील दोन महिन्यांतही फारसा पाऊस पडलेला नाही. जून आणि जुलै महिन्याअखेरीस पडलेल्या पावसामुळे सरासरी इतका पाऊस नोंदला गेला. जुलै महिन्यात पावसाची तूट नोंदली गेली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस पाऊस पडलेलाच नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या, मात्र, या कालावधीत मुसळधार पाऊस पडलेला नाही. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. दिवसभरात १ ते ३ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वमानानुसार, ऑगस्ट महिन्यात मुंबईत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस फारसा पाऊस नसेल. त्यानंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी १०४८.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. सरासरी पूर्ण होण्यासाठी दोन्ही केंद्रात मिळून ९४५.५ मिमी पावसाची आवश्यकता आहे.

जुलैमध्ये पावसाची तूट

मुंबईत जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते ३१ जुलैदरम्यान कुलाबा केंद्रात ३७८.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये कुलाबा केंद्रात ३५५.७ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात ६५.१ मिमी कमी पाऊस नोंदला गेला.

मे महिन्यातच सर्वाधिक

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मुंबईत १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला. वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.