मुंबई : जवळच्या प्रवासाला रिक्षाचालकांकडून कायम नकार दिला जातो. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या प्रवासासाठी अनेक अडचणी येतात. ऑटो रिक्षाचालकांकडून कमी अंतराच्या प्रवासाला नकार देण्याच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई रिक्षाचालक संघाने एक नवीन मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रवाशांना हा कटू अनुभव येऊ नये आणि संपूर्ण शहरात, विशेषतः उपनगरांत रिक्षा सेवा सुरळीत राहावी हा यामागील प्रयत्न आहे.
मुंबईतील रेल्वे आणि बेस्ट बसमध्ये होणारी गर्दी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. प्रवाशांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सीचा वापर करावा लागतो. तसेच प्रवाशांना ॲप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप असल्याने आणि चालकांनी उबर ॲपवर बहिष्कार घातल्याने ती सेवाही कोलमडली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. तर, रिक्षा-टॅक्सी चालकांचा मनमानी कारभारामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचणे अवघड झाले होते.
ॲपसाठी कुणी घेतला पुढाकार
मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांच्या नेतृत्वाखालील अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरण (एमएमआरटीए) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक आणि बंदरे) यांना एक प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये सध्याच्या प्रणालींना प्रवाशांसाठी अनुकूल, पारदर्शक आणि नियमांचे पालन करणारा पर्याय म्हणून अधोरेखित केला आहे.
ॲपचा मुख्य उद्देश काय ?
कमी अंतराची सेवा प्रदान करण्यासाठी रिक्षा चालक नाखुश असतात. दूरच्या भाड्याच्या शोधात रिक्षाचालक असल्याने प्रवाशांना वेळेत रिक्षा मिळत नाही. अनेकदा रिक्षाचालक जवळच्या भाड्यासाठी मीटरऐवजी मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. परिणामी, कमी अंतरासाठी प्रवाशांना रिक्षा सेवा उपलब्ध करून देणे हा ॲपचा मुख्य उद्देश आहे.
ॲपवर कोणत्या सुविधा मिळणार
या ॲपवर प्रवाशांना आगाऊ रिक्षा आरक्षित करता येतील. तसेच रिक्षा चालकांकडून जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला नकार दिला जाणार नाही. सर्व भाडे काटेकोरपणे मीटरआधारित असतील. एमएमआरटीएने मंजूर केलेल्या दरांचे पालन केले जाईल. त्यामुळे जास्त भाडे आकारणी रोखता येईल. प्रत्येक प्रवासाचा दस्ताऐवज ठेवला जाईल. महिला प्रवाशांसाठी विशेष ‘पिंक ऑटो’ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
परवडणाऱ्या किमतीत ॲप
दररोज २५ रुपये किंवा कमीतकमी मासिक वर्गणी भरून हे ॲप वापरता येईल. प्रवासी रिक्षा आरक्षित केल्यानंतर चालकाला त्या ठिकाणी पोहचण्यासाठी, ५०० ते ७०० मीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी इंधन खर्च आणि मेहनत वाया जाते. तसेच, काही वेळा फेरी रद्द देखील होते. त्यामुळे युनियनने रेल्वे स्थानकांवर वापरल्या जाणाऱ्या प्रीपेड ऑटो योजनांप्रमाणेच एक प्रोत्साहन यंत्रणा सुचवली आहे, जी अशा नुकसानासाठी भरपाई देईल. तसेच, फेरी रद्द झाल्यास चालकांना रिअल-टाइम सूचना मिळेल. त्यामुळे गोंधळ आणि वेळेचा अपव्यय कमी होईल.