मुंबई : कल्याण येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीची कॅडेट रिषिका रमेश कदम हिने २८ मे ते १ जून या कालावधीत नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या दुसऱ्या ‘इंडो – नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा २०२५’मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. रिषिकाने विविध योगासने सादर करीत उपस्थितांना थक्क केले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील एनसीसीच्या अधिकाऱ्यांकडून तिला नुकतेच सन्मानित करण्यात आले.

कॅडेट रिषिका कदम १६ ते २० वयोगटातील स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने कौशल्य आणि शिस्तीची सांगड घालत विविध योगासने सादर करून उपस्थितांना थक्क केले. या यशाबद्दल तिला मेजर जनरल योगेंद्र सिंह (व्हीएसएम, एडीजी एनसीसी महाराष्ट्र संचालनालय) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालय मुख्यालयात पार पडला. यावेळी रिषिका कदम हिचे पालक, संचालनालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी रिषिकाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नेपाळमधील काठमांडू येथे रंगलेल्या ‘इंडो – नेपाळ युवा क्रीडा स्पर्धा २०२५’मध्ये विविध ९ देशातील ४० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. भारत, बांग्लादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया या नऊ देशांतील स्पर्धकांनी योगासने सादर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.