मुंबई : मुंबईतील हवेत फेब्रुवारी – एप्रिल २०२५ दरम्यान पीएम १० धूलीकणांची पातळी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअर’ ( सीआरईए) या संस्थेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीवरून केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पीएम १० धूलीकणांची मासिक सरासरी पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक होती, तर एप्रिल महिन्यामध्ये यात सुधारणा झाली होती. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण २८ दिवसांमध्ये पीएम १० धूलीकणांनी पातळी ओलांडली होती, तर मार्च महिन्यात ३१ पैकी १७ दिवस आणि एप्रिल महिन्यात ३० पैकी चार दिवस पीएम १० धूलीकणांचे प्रमाण अधिक होते. एकूण ८९ पैकी ४९ दिवस मुंबईतील हवेत पीएम १० धूलीकणांचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. म्हणजेच एकूण कालावधीमध्ये ५५ टक्के दिवस मुंबईतील पीएम १०ची पातळी अधिक होती.
मुंबईतील हवा गुणवत्तेची नोंद ३० कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सद्वारे केली जाते. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये पीएम १० ची मासिक सरासरी पातळी अनुक्रमे १३० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर , १०८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर आणि ७८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी नोंदवण्यात आली. दरम्यान, या काळात पीएम २.५ ची पातळी सरासरी इतकीच होती. सीपीसीबीने पीएम १० ची (१० मायक्रॉन व्यासाच्या कणांसाठी) २४ तासांच्या सरासरीसाठी १०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी मर्यादा निर्धारित केली आहे. तर पीएम २.५ (२.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा लहान व्यासाच्या कणांसाठी) ही मर्यादा ६० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी आहे.
दरम्यान, धुलीकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते.अतिसूक्ष्म धुलीकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ असून या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. अतिसूक्ष्म धुलीकणापेक्षा किंचित मोठा म्हणता येईल असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धुलीकणाला पीएम १० म्हटले जाते. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) हवेची गुणवत्ता ठरते. ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो.
मुंबईतील प्रत्येक प्रदूषणग्रस्त भागाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रस्तावित एअरवाइझ प्रणालीसह प्रत्यक्ष वेळेत स्रोताचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, म्हणजे वाहतूक, उद्योग, बांधकाम की कचरा जाळणे यापैकी नेमके कशामुळे प्रदूषण होते हे ओळखता येईल. त्याचप्रमाणे, ठोस उपाययोजना प्रभावीपणे राबवता यावी यासाठी आणि या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी क्षमताबांधणी उपक्रमांचीही तितकीच गरजेची आहे, असे मत सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअरचे विश्लेषक मनोज कुमार यांनी व्यक्त केले.
फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत पीएम१० धूलीकणांचे प्रमाण अधिक असलेली ठिकाणे
फेब्रुवारी
१) देवनार- २२५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
२) वांद्रे कुर्ला संकुल – १७५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
३) मालाड (पश्चिम) – १७५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
मार्च
१) देवनार – २०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
२) वांद्रे कुर्ला संकुल – १५० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
३) चकाला, अंधेरी (पूर्व)- १४० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
एप्रिल
१) देवनार – १५५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
२) चकाला,अंधेरी (पूर्व)- ११९ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
३) कुर्ला- ११२ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर
मुंबईतील खालवणारी हवेची गुणवत्ता ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब बनली आहे. पीएम २.५ मुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. अनेक भागांमध्ये वाढणाऱ्या पीएम १० धूलीकणांच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. पीएम १० चे प्रमाण अधिक असलेली देवनारसारखी प्रदूषित ठिकाणे निश्चित करणे अत्यावश्यक आहे. या प्रदूषणाच्या वाढीमागची कारणे शोधणेही तितकेच गरजेचे आहे. भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन