मुंबई : ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवात दर्शनाच्या रांगेसाठी अडथळे उभे करण्याकरिता खोदलेले खड्डे न बुजविल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मंडळाला तीन लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. मंडळाने पदपथ, रस्त्यांवर खोदलेले १८३ खड्डे न बुजविल्याने हा दंड केल्याचे पालिकेच्या ई विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘लालबागचा राजा’ मंडळाला महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने ७ सप्टेंबर रोजी नोटीस दिली आहे. ‘ई’ विभागाच्या हद्दीतील रस्त्याची ५ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी ‘लालबागचा राजा’ मंडळाने टी. बी. कदम मार्ग (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बििल्डगपर्यंत) ई विभाग कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे संरक्षण मार्गिका उभारण्यात आली होती. रस्यावर बांबूच्या साहाय्याने तयार केलेल्या संरक्षण मार्गिकेसाठी (बॅरिकेड्स) १८३ खड्डे खोदण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. पदपथावर ५३ व रस्त्यावर १५० खड्डे खोदण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रत्येक खड्डय़ाला २००० रुपये याप्रमाणे तीन लाख ६६ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून त्याचा त्वरित भरणा करावा असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
मंडळाची नाराजी..
‘लालबागचा राजा’ सार्वजनिक उत्सव मंडळाने महानगरपालिकेच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. काळाचौकी पोलिसांच्या विनंतीवरून भायखळा परिसरात हे बॅरिकेडस उभारण्यात आले होते. त्यामुळे त्याचा नियमाप्रमाणे कर भरणा आम्ही करू, पण तो दंड नाही, असे मत मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी व्यक्त केले. टी. बी. मार्गापर्यंत लालबागच्या मंडळाची रांग जात नाही, पण पोलिसांच्या सूचनेनुसार कायदा सुव्यवस्थेसाठी ही संरक्षण मार्गिका उभारण्यात आली होती. नियमानुसार आम्ही रक्कम भरू, पण आम्ही अनधिकृतपणे खड्डे खोदलेले नाहीत, असेही ते म्हणाले. दरम्यान, पालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसारच दंड आकारणी करण्यात आल्याचे उपायुक्त रमांकांत बिरादार यांनी सांगितले.