एक्स या समाज माध्यमावर पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट केल्यामुळे मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्यध्यापिकेला शाळा व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितल्याचा प्रचार उघडकीस आला आहे. परवीन शेख असं या मुख्यध्यापिकेचं नाव आहे. त्या मागील १२ वर्षांपासून या शाळेत काम करत असून गेल्या ७ वर्षांपासून शाळेच्या मुख्यध्यापिका आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला असून मी या शाळेच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, परवीन शेख यांनी मागील काही दिवसांत पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या पोस्टवर लाईक आणि कमेंट केल्याचे वृत्त एका वेबसाईटने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर शाळा व्यवस्थापाने परवीन शेख यांना बोलावून राजीनामा देण्यास सांगितले. तसेच हा निर्णय आमच्यासाठी कठीण असल्याचेही शाळा व्यवस्थापनाने त्यांना सांगितले.

हेही वाचा – मुंबई : मोबाइल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू…

यासंदर्भात बोलताना, २४ एप्रिल रोजी हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने मला राजीनामा देण्यास सांगितले. तसेच हा निर्णय त्यांच्यासाठी कठीण आहे, असंही त्यांनी मला सांगितले. त्यानंतरही मी पुढचे काही दिवस काम करणे सुरु ठेवले. मात्र, त्यानंतर राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे, अशी माहिती परवीन शेख यांनी दिली. तसेच मी लोकशाही असलेल्या भारतात राहत असून मला बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमय्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिकपणे राजकीय विषयांवर टिप्पणी करू नये, असे कोणताही धोरण नाही. मार्च महिन्यात झालेल्या एका बैठकीत, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर त्यांचे विचार मांडण्याची परवानगी आहे असे स्पष्ट करण्यात आले होते, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शाळेच्या प्रवक्त्यांनी दिली.