Ghatkopar News : एका चिमुकलीचा जीव वाचवताना गवंडीचं काम करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चिमुकलीचा जीव वाचला असला तरीही तिला वाचवायला गेलेल्या शहजाद शेख (२७) या तरुणाचा मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर (पूर्व) येथील रमाबाई कॉलनी परिसरात रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली बंजारा नावाची एक लहान मुलगी चेंडूने खेळत होती. पण खेळता खेळता तिचा चेंडू नाल्यात पडला. नाल्यातील चेंडू काढण्यासाठी ती गेली असता तिचा तोल जाऊन तीही नाल्यात पडली.

नाल्यात पडल्यानंतर तिने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून दोन शेजारी संदीप सुतार (३७) आणि शहजाद शेख (२७) तिच्या मदतीसाठी आले. तिला वाचवण्यासाठी दोघांनीही नाल्यात उडी मारली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दोघांनीही तिला सुखरुप बाहेर काढलं. त्यानतंर सुतारही बाहेर आला. पण शेखचा पाय नाल्यातील गाळ्यात अडकला आणि तो बाहेर येण्यासाठी धडपडू लागला. अखेर तो नाल्यात बुडाला. या अपघाताविषयी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आलं. तेही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अन् शेखला बाहेर काढलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत तरुणाच्या पश्चात पत्नी आणि चार मुले

शेखला उपचाराकरता तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याला तिथे मृत घोषित करण्यात आलं. पंत नगर पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेख विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि चार मुले आहेत.