मुंबई : जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषणकाळात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे मगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. पर्युषण पर्वाला मंगळवारपासून सुरूवात झाली.

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीज आणि शेठ भेरूलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक ट्रस्टने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी महापालिकेच्या वकिलांनी ही माहिती दिली. पर्युषण काळात नऊ दिवसांऐवजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या ३० ऑगस्ट २०२४च्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.

मागील सुनावणीच्या वेळी या याचिकांची दखल घेऊन न्यायालयाने महापालिकेला निर्यणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांच्या या मागणीमुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही अशी मागणी केली जाईल, असे न्यायालयाने सुनावले होते. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पर्युषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्याचे महापालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

दरम्यान, अहिंसेचे महत्त्व अधोरेखीत करताना पर्युषण पर्वातील नऊ दिवसांच्या कालावधीत प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देणे हे जैन धर्माच्या भावनांचे उल्लंघन आहे. तसेच, धर्माच्या हेतूला धक्का पोहोचवणारे आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. तसेच, पर्युंषण पर्वात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली गेली. न्यायालयाने मात्र ही मागणी मान्य केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना, कत्तलखाने बंद ठेवणे हा धोरणात्मक निर्णयाचा भाग असल्याचे नमूद करून याचिकाकर्त्यांच्या मागणीच्या कायदेशीर वैधतेबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. कोणत्या वैधानिक तरतुदींतर्गत कत्तलखाने नऊ दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत ? अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली होती.