मुंबई : रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेवरील लोकल रविवारच्या किंवा सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार धावतात. या वेळापत्रकानुसार मध्य रेल्वेवरील सुमारे ३५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. परिणामी सुट्टीच्या दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावत असून ध्वजारोहण आणि इच्छित कामानिमित्त जाणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी नोकरदारांची गैरसोय झाली.

काही सणांच्या दिवशी मुंबईतील अनेक कार्यालयांना सुट्टी नसते. त्यामुळे ही कार्यालये सुरू असतात. कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करून कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अनेक कर्मचारी मुंबईतील कार्यालयात येतात. परंतु, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असते. तसेच पर्यटक व इतर प्रवाशांची गर्दी असते. मात्र या दिवशी मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू केले आहे. परिणामी संपूर्ण दिवसभरात मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे ३५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता असून त्यांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांचे म्हणणे काय

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व कार्यालये बंद असतातच असे नाही. तसेच १५ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचारी ध्वजारोहणासाठी कार्यालयीन स्थळी जातो. त्यामुळे सकाळी लोकल, बेस्ट बसला खासगी, सरकारी कर्मचाऱ्यांची नेहमीप्रमाणे गर्दी असते. त्यामुळे सुट्टीकालीन वेळापत्रक रद्द करणे आवश्यक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल चालवण्याने, अनेक लोकल फेऱ्या रद्द, लोकल विलंबाने धावतात. परिणामी, लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. तर, अनेकांना प्रवासादरम्यान धक्काबुक्की सहन करावी लागली.

मध्य रेल्वेचे अधिकारी उदासीन

लोकलचे सुट्टीकालीन वेळापत्रक बदलावे, अशी मागणी प्रवासी सातत्याने करीत आहेत. यासाठी प्रवासी संघटना मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मध्य रेल्वेचे अधिकारी याबाबत उदासीन असल्याने प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल नोव्हेंबर २०२३ मध्ये हा विषय मार्गी लावण्यासाठी विचाराधीन होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेवर रविवारचे किंवा सुट्टीकालीन वेळापत्रकाऐवजी काय करता येईल, कोणता तोडगा काढता येईल, याविषयी प्रयत्नशील होते. परंतु, त्यानंतर ठोस सकारात्मक निर्णय झाला नाही, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.