मुंबईः रिक्षात मैत्रिणींशी बोलत असल्याचा जाब विचारल्याच्या रागातून १८ वर्षांच्या तरूणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी टिळक नगर परिसरात घडला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
टिळक नगर येथील लोकमान्य टिळक चौक परिसरात बुधवारी ही हत्या घडली. याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी दिप्या ऊर्फ दिपेश संदीप भोसले हा ३० जुलैला मैत्रिणींसह रिक्षात बोलत बसला होता. त्यावेळी मृत खुशाल जयगणेश शिंदे(१८) याने हटकले. तसेच त्याच्यासह असलेल्या मैत्रिणींनाही शिवीगाळ केली. त्याचा राग आरोपी भोसलेला आला होता. त्याने बुधवारी दोन साथीदारांसह शिंदेला अडवले. त्याला धमकावले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी संतापलेल्या दिपेशने त्याच्याकडील चाकू बाहेर काढला व शिंदेच्या छातीत मारला. तो तात्काळ खाली कोसळला. आरोपींनी तेथून पलायन केले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शिंदेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शिंदेला मृत घोषित केले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी शिंदेचा मित्र समाधान रमेश सोनावणे(१८) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य आरोपी दिपेश भोसले, त्याचा साथीदार सुमीत सोनावणे यांना अटक केली. प्रकरणी एका अल्पवयीन मुलाचाही गुन्ह्यात सहभाग असून पोलिसांनी त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली आहे. दिपेशने हत्येत वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी काही प्रत्यक्षदर्शींचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात शिंदेने ३० जुलैला हटकल्याच्या रागातूनच हा प्रकार केल्याचे चौकशीत आरोपीने सांगितले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.