कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या चाचणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मेट्रो ३ मार्गिकेतील आठ डब्यांच्या पहिल्या मेट्रो गाडीचे चार डबे मंगळवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आता उर्वरित चार डबे शुक्रवारी पहाटे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या डब्यांची रुळांवर जोडणी करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन किमीपर्यंत मेट्रो गाडीची चाचणी घेण्यात येईल.
मेट्रो ३ चा सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरसीने ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वप्रथम कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे होते. आता पुन्हा एकदा आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय झाला आहे. आता कारशेडचे काम मार्गी लावून एमएमआरसीने कित्येक महिने रखडलेली चाचणीही मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील कारखान्यात पडून असलेली तयार मेट्रो गाडी मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. १७ जुलैला आठपैकी चार डबे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि मंगळवारी पहाटे डबे मुंबईत दाखल झाले. उर्वरित चार डबेही शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. १४०० किमीचा प्रवास पार करून दाखल झालेले हे डबे आता रुळावर उतरविण्यात येणार आहेत. दोन दिवसांत आठ डब्यांच्या गाडीची जुळणी केली जाईल आणि नंतर तात्पुरती कारशेड (सारिपुत नगर) ते मरोळ नाका अशी तीन किमीची चाचणी घेण्यात येईल असे एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मेट्रो ३ ची चाचणी होण्याची शक्यता आहे.