यंदा निर्बंधमुक्त वातावरणात जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. मात्र करोनापूर्वकाळातील सुमारे दोन हजार ७६२ घरगुती, तर दोन हजार ६६ सार्वजनिक मंडळांनी यंदाही गणेशोत्सव साजरा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा एक लाख ७६ हजार ३०० घरगुती, तर नऊ हजार ९६७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करीत धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला. मात्र २०१९ च्या तुलनेत ही संख्या कमी आहे.मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडला आणि त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत गेली. रुग्णसंख्या फोफावू नये यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आणि अवघ्या कारभार ठप्प झाला. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर काही कडक निर्बंध शिथील करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : राज्यात वाहनचालकांकडून सीटबेल्टच्या नियमाला हरताळ ; तीन वर्षांत २५ लाख प्रकरणांची नोंद

तसेच हळूहळू अटीसापेक्ष दुकाने, उपाहारगृह, चित्रपटगृह, वाहतूक आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र या पार्श्वभूमीवर आलेला गणेशोत्सवही कडक निर्बंधांनुसार साजरा करावा लागला होता. करोनाचा धोका लक्षात घेऊन २०२० मध्ये एक लाख २४ हजार ९३० कुटुंबियांनी, तर सहा हजार ४४३ गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मात्र करोनाची भिती, कडक निर्बंध यामुळे ५४ हजार १३२ कुटुंबियांनी आणि पाच हजार ५९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नाही.

हेही वाचा >>> नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान नवीन उड्डाणपूल? ; लोकप्रतिनिधी-रहिवाशांची एमएमआरडीएकडे मागणी

करोनापूर्वकाळात २०१९ मध्ये एक लाख ७९ हजार ०६ कुटुंबियांनी आणि १२ हजार ०३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला होता. मुंबईत २०२१ मध्ये करोनाची स्थिती काहीशी निवळली होती. त्यामुळे निर्बंधसापेक्ष गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली होती. यावर्षी एक लाख ५० हजार ४५४ कुटुंबांनी, तर आठ हजार ०४९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला होता.यंदा करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने सर्वच निर्बंध हटविले होते. त्यामुळे यंदा मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा झाला. सुमारे एक लाख ७६ हजार ३०० कुटुंबियांनी आणि नऊ हजार ९६७ मंडळांनी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सव साजरा केला. करोनापूर्वकाळाच्या तुलनेत आजही दोन हजार ७६२ कुटुंबियांनी आणि दोन हजार ६६ मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नसल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवरून स्पष्ट झाले आहे.

विसर्जन मिरवणुकीलाही कमी उपस्थिती
करोनापूर्व काळात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गिरगाव, दादर, जुहू यासह अन्य चौपाट्यांवर भाविक प्रचंड गर्दी करीत होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत होते. मंत्र यंदा त्या तुलनेत मिरवणुकांमधील गर्दी कमी होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी गणेश विसर्जन झाले. त्याला जोडून आलेला दुसरा शनिवार आणि रविवार असा सुट्टीचा योग विचारात घेऊन अनेकांनी पर्यटनासाठी जाणे पसंत केले. तर अनेकांच्या मनात करोना संसर्गाची धास्ती असल्यामुळे त्यांनी मिरवणुकीतील गर्दीत सहभागी होण्यापासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये २०१९ च्या तुलनेत काही अंशी गर्दी कमी होती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai this year too 2066 ganeshotsav mandals are away from the festival mumbai print news amy
First published on: 10-09-2022 at 16:33 IST