सामान्य लोकल गाडीच्या १२ डब्यांपैकी सहा डबे वातानुकूलित

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर धावत असलेल्या बारा डबा सामान्य लोकल गाडीचे सहा डबे लवकरच वातानुकूलित होणार आहेत. या कामाला मूर्तरूप देण्यासाठी मुंबईत बारा डब्यांच्या ३९ वातानुकूलित लोकल गाडय़ा चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (आयसीएफ) येत्या काही महिन्यांत दाखल केल्या जातील. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने आयसीएफला सूचना केल्या आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बारा डब्यांपैकी सहा डबे वातानुकूलित करण्यात येणाऱ्या जवळपास ७८ लोकल गाडय़ा चालविण्यात येतील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली. या लोकल गाडीच्या सुरुवातीला सहा फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यानंतर फेऱ्यांचा विरापर्यंत विस्तार करत दिवसाला बारा फेऱ्या चालविण्यास सुरुवात झाली. मात्र या फेऱ्या चालविताना सामान्य लोकल गाडीच्या बारा फेऱ्यांवर गदा आली आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अखेर ही गैरसोय पाहता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सामान्य लोकल गाडीचे बारापैकी सहा डबे वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली.

रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ यासंदर्भात रेल्वे बोर्डाला आदेश देऊन त्यावर आयसीएफला काम करण्याच्या सूचनाही केल्या. त्यानुसार रेल्वे बोर्डाने आयसीएफला सामान्य लोकल गाडीच्या सहा डबे वातानुकूलित करण्यासाठी बारा डब्यांच्या ३९ वातानुकूलित लोकलची त्वरित बांधणी करण्यास सांगितले आहे. या लोकल मुंबई उपनगरीय मार्गावरील कारशेडमध्ये दाखल करून त्यानंतर सामान्य लोकल गाडीला त्यांचे डबे जोडले जातील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

सुरुवातीला ७८ लोकल

सुरुवातीला ७८ लोकल गाडय़ा चालविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. बदल करण्यात येणाऱ्या लोकल गाडय़ांमध्ये ६४ बम्बार्डियर आणि सीमेन्स लोकल गाडय़ा, तर १४ मेधा लोकल असतील. यासंदर्भात आयसीएफने काही तांत्रिक बाबी सोडविण्यासाठी वेळही मागितला असला तरीही या कामासाठी दुसरीकडे रेल्वेकडून निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

पाच ते सात वर्षांत गाडय़ांची संख्या ४७८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सहा डबे वातानुकूलित असलेल्या ७८ लोकल गाडय़ा, एमयूटीपी ३ मधील ४७ वातानुकूलित लोकल, तर एमयूटीपी ३ ए मधील २१० वातानुकूलित लोकल गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. पाच ते सात वर्षांत या लोकल गाडय़ा दाखल करतानाच सामान्य लोकल गाडय़ांची संख्या १५३ पर्यंत आणण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे एकूण लोकल गाडय़ांची संख्या ४७८ पर्यंत पोहोचणार आहे.