कोकण मार्गावर आणखी दोन बससेवा लवकरच
कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना एसटी महामंडळाने मुंबई ते पणजी अशी शिवशाही वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबरपासून या सेवेचा प्रारंभ झाला असून पहिल्याच फेरीत प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याआधी मुंबई ते रत्नागिरी अशी बससेवा सुरू आहे. तर मुंबई सेन्ट्रल ते दापोली आणि मुंबई सेन्ट्रल ते चिपळूण बस फेरीही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
नाताळ सुट्टीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई ते पणजी वातानुकूलित शिवशाही बससेवा मुंबईकरांना आणि पर्यटकांना उपयुक्त पडेल. ही बस अत्यंत उपयुक्त असून ९१३ रुपये इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. मुंबई सेन्ट्रल येथून रोज सायंकाळी ५.०० वाजता बस सुटेल आणि पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. तसेच पणजीहून रोज सायंकाळी ६.०० वाजता याच मार्गावरून परतीचा प्रवास करणार आहे. ४५ आसन असलेली ही बस हाउसफुल झाली आहे.