मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक आज (शुक्रवार) दुपारपासून पूर्णपणे कोलमडली आहे. कल्याणजवळ मंगला एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याची घटना यासाठी निमित्तमात्र ठरली. त्यानंतर इंजिनाची दुरुस्ती करुन मंगला एक्स्प्रेस मार्गस्थ झालेल्या तब्बल तीन तास उलटल्यानंतरही मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या गोंधळामुळे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून डाऊन दिशेची वाहतूक जवळपास ठप्प झाल्यात जमा आहे. याचा सर्वाधिक फटका जलद मार्गावरील वाहतुकीला बसला आहे. वेळापत्रक कोलमडल्याने अनेक गाड्या ट्रॅकवर एकामागोमाग उभ्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या गोंधळाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या जलद गाड्यांप्रमाणेच एक्स्प्रेस गाड्याही ट्रॅकवर खोळंबून राहिल्या आहेत. अप दिशेने येणाऱ्या लोकल गाड्याही उशिराने धावत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार डाऊन दिशेची वाहतूक तब्बल एक ते दीड तास उशिराने सुरू आहे. या सगळ्यामुळे वीकेंड मुडमध्ये गेलेल्या नोकदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.  तर दुसरीकडे हार्बर मार्गावर कुर्ला- टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद झाल्याने मुंबईहून पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या ठिकाणीही सध्या सावळा गोंधळ सुरू आहे.  शुक्रवारी सकाळी नाशिक- मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ओढा- नाशिकदरम्यान वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.

दुसरीकडे मुंबई- नाशिक महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, ठाण्यातील मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजीवडा नाका, माणकोली नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
ठाण्यातून नाशिक आणि नवी मुंबईकडे बाहेर पड़णाऱे सगळे रस्ते जाम झाले आहेत. मुंबई-नाशिक हायवेवर तीन अवजड वाहने काही अंतरावर भर रस्त्यात बंद पडल्याने रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली. परिणामी काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शिऴफाट्यापर्यंत वाहतूक संथगतीने सुरु आहे.. मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरात पावसानं मोठे खड्डे पडले आणि रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे जुना मुंबई-पुणे हायवे सात ते आठ किलोमीटर्सचा जाम झाला आहे. तर ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या रांगा पनवेलपर्यंत लागल्याच चित्र होत. तसेच रॅन्सम वायरस अटॅकमुळे जेएनपीटी बंदरात कंटेनर्सची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंटेनर्स बाहेर अडकले असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.