मुंबई : न्यायालयाने माझी निर्दोष सुटका केल्याचे मी ऐकले, त्यावेळी १९ वर्षांनंतर मला न्याय मिळाला अशी भावना मनात आली. मोहम्मद अली शेख यांना ७/११ बॉम्बस्फोटात सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर १९ वर्षांनंतर ते कारागृहातून बाहेर आले. यावेळी आम्हाला याप्रकरणात फसविण्यात आले होते. मात्र आम्ही सत्याची लढाई सुरू ठेवली आणि माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती काढत होतो. उच्च न्यायालयाने आमचे ऐकले आणि आम्हाला न्याय दिला, असे शेख यांनी सांगितले.

‘‘माझी बाजू सत्याची आहे, मग मला घाबरायची गरज नाही, मी असेच मनाला समजावून सांगत होतो. वास्तविक पाहता आम्हाला फसवून एक कहाणी रचण्यात आली आणि आम्हाला कारागृहात टाकण्यात आले. आम्ही घरामध्ये १४ जण रहायचो, पण हे घर बंद असल्याचा आरोप दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केला होता. आम्ही घर बंद करून बाहेर गेलो होतो, असे सांगितले. पण प्रत्यक्षात आम्ही घरीच होताे. माझ्याविरोधातही ज्याने साक्ष दिली, त्यानेही नंतर मी काही पाहिले नसल्याचे सांगितले. सुरुवातीला माझ्याविरोधात कोणतीही साक्ष देण्यात आली नव्हती. पण १०० दिवसांनी माझ्या विरोधात साक्ष देण्यात आली, या सर्व गोष्टींचाही उच्च न्यायालयाने विचार केला”, असे शेख यांनी सांगितले.

बॉम्बस्फोटाच्या दिवशी मी घरीच होतो. त्यावेळी आम्ही परिसरातील काही अवैध धंदे आंदोलन करून बंद पाडले. त्यावेळी ‘गांधी मत बनो’ अशी मला धमकी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात दोन महिने मला अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्यात आले. कुटुंबियांना धमकावण्यात आले. आमचा जबरदस्ती कबुली जबाब घेण्यात आला. मला त्रास देण्यात आला, रचण्यात आलेल्या सर्व कहाणीवर माझी स्वाक्षरी घेण्यात आली. कॅमेऱ्यासमोर आमचा कबुलीजबाब घेण्यात आला. ते दिवस खूप कठीण होते, असे शेख यांनी सांगितले.

पूर्वीचा निर्णय एकतर्फी होता. एवढ्या वर्षांत मला पॅरोल व फरलोही मिळाला नाही. या काळात माझ्या वडिलांचा व भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी चार दिवसांच्या पॅरोलसाठी मी अर्ज केला होता. मात्र माझ्याकडे मोठी रक्कम मागण्यात आली. तेवढी रक्कम नसल्यामुळे मला अंत्यविधीलाही येता आले नाही याचे मोठे दुःख आहे, अशा भावना शेख यांनी व्यक्त केल्या. माझ्यासह माझ्या कुटुंबालाही यामुळे त्रासाला सामोरे जावे लागले, त्याला ‘एटीएस’ जबाबदार आहे, असा आरोप शेख यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझे प्रचंड वैयक्तिक नुकसान दुःखाच्या प्रसंगी तर सोडा, पण मुलीच्या लग्नाला देखील येता आले नाही. या सर्व प्रकरामुळे माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले, त्याचे काहीही मोल नाही. पण यावेळी सत्याचा विजय झाला. निर्णय जरी आमच्या विरोधात लागला असता, तरी आम्हीही सर्वोच्च न्यायलयात गेलो असतो. सर्वोच्च न्यायालयातही आमचा विजय होईल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.