मुंबई : लालबाग राजा प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यावर दोन मुलांना धडक देऊन फरार झालेल्या ट्रक चालकाला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात २ वर्षीय लहान मुलीचा मृत्यू झाला होता.लालबाग परिसरातल सफाई काम करणारी सुमन वजनदार नावाची महिला चंदा (२) आणि शैलेश (११) या मुलांसह शनिवार ६ सप्टेंबर रोजी पहाटे लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर झोपली होती.
विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी शनिवारी मुंबईत लगबग सुरू होती. पहाटे ४ च्या सुमारास एक अज्ञात वाहनाने झोपलेल्या दोन लहान मुलांना जोरदार घडक दिली. त्यात चंद्रा वजनदार (२) आणि तिचा भाऊ शैलेश वजनदार (११) जखमी झाला. स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी झालेल्या चंद्राचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
काळाचौकी पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे फरार ट्रकचालकाला शोधून अटक केली. संतोष गुप्ता (२७) असे या चालकाचे नाव असून तो घाटकोपरमध्ये वास्तव्याला आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहतूक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.