मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका विद्यार्थ्यांना सातत्याने बसत असून चुकीची प्रश्नपत्रिका हाती आल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाचे सत्र वर्षभरानंतरही कायम आहे. चुकीची प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने म्हणजेच ‘सीडीओई’ने (पूर्वीचे आयडॉल) तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटूनही ‘एम.ए. – शिक्षणशास्त्र’च्या काही विद्यार्थ्यांचा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. निकालापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना गतवर्षी ‘ॲडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाची ७५ ऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘सीडीओई’चे तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही आणि कलिना संकुलातील परीक्षा भवनात वारंवार फेऱ्या मारूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राने म्हणजेच ‘सीडीओई’ने २८ मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ‘एम.ए. – शिक्षणशास्त्र’ अभ्यासक्रमाची प्रथम सत्र परीक्षा घेतली होती. ही परीक्षा ७५ गुणांची लेखी परीक्षा व २५ गुणांचे अंतर्गत मूल्यमापन अशी होती. परंतु ठाण्यातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर २८ मार्च २०२३ रोजी विद्यार्थ्यांना ‘अॅडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाची ७५ ऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली.

हेही वाचा : जी.टी, कामा रुग्णालयाचे संयुक्त वैद्यकीय महाविद्यालय; वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

ही बाब विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांच्या तात्काळ लक्षातही आणून दिली. परंतु विद्यापीठाकडून ६० गुणांचीच प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे विद्यार्थांना ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा द्यावी लागली. या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल ९ महिन्यांनंतर २ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र निकालपत्रात ठाण्यातील महाविद्यालयात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे नावच समाविष्ट नव्हते. अद्यापही या विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विद्यापीठ प्रशासन कोणत्याही गोष्टीचे पूर्वनियोजन करीत नाही. आम्ही नोकरी सांभाळून शिक्षण घेत आहोत. परंतु परीक्षेला मोजकेच दिवस शिल्लक असताना वेळापत्रक जाहीर करणे, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, निकाल विलंब आणि जाहीर झालेल्या निकालांमधील त्रुटींमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आता एक वर्ष होऊनही आमचा ‘एम.ए. – शिक्षणशास्त्र’ सत्र १ परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. कलिना संकुलात गेल्यानंतर अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नाही’, अशी खंत एका विद्यार्थिनीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

हेही वाचा : आता विकासकांना तीन स्वतंत्र बँक खाती बंधनकारक; प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात शिस्तीच्या अनुषंगाने महारेराचा निर्णय

विलंबासाठी कठोर कारवाई का नाही?

मुंबई विद्यापीठाने निकाल विलंबाची परिसीमा गाठलेली आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला विशेष पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. निकाल प्राप्त करण्यासाठी ‘सीडीओई’च्या ‘एम. ए. – शिक्षणशास्त्र’च्या काही विद्यार्थ्यांनी वारंवार कलिना संकुलात फेऱ्या मारल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नवनियुक्त संचालकांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आता निकाल विलंबाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?’, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला आहे.