मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने आणि ‘नॅक’ने लागू केलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन व पुनर्मूल्यांकनासाठी उच्च शिक्षण संस्थांच्या नोंदणीचे संकेतस्थळ अद्याप कार्यान्वित झालेले नसल्यामुळे ‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे ‘नॅक’ मूल्यांकन तथा पुनर्मूल्यांकन व ‘एनबीए’साठी आवश्यक पूर्तता न करणाऱ्या मुंबई विद्यापीठाशी संलग्नित १५६ महाविद्यालयांना दिलासा मिळाला असून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविता येणार आहे. मात्र हा निर्णय महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना न करणाऱ्या मुंबई विद्यापीठाशी संलग्नित ७३ महाविद्यालयांना लागू राहणार नाही, सदर महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगितच राहणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम ९७ अन्वये प्रत्येक संलग्न, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामध्ये महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना करणे अनिवार्य आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम ११० (४) नुसार प्रत्येक संलग्नित महाविद्यालयांने ‘नॅक’ मूल्यांकन तथा पुनर्मूल्यांकन व ‘एनबीए’साठीची आवश्यक पूर्तता करणे अनिवार्य आहे. मात्र विद्यापीठाने वेळोवेळी परिपत्रक, सूचना आणि स्मरणपत्र पाठवूनही १५६ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन तथा पुनर्मूल्यांकन व ‘एनबीए’साठी आवश्यक पूर्तता केलेली नाही, तर महाविद्यालय विकास समितीची ७३ महाविद्यालयांनी स्थापना केलेली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने अलीकडेच घेतला होता. मात्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाकडून ‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित १५६ महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. मात्र ‘सीडीसी’ची स्थापना न करणाऱ्या ७३ महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगितच राहणार आहे.
दरम्यान, उच्च शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार ‘नॅक’ मूल्यांकन तथा पुनर्मूल्यांकन व ‘एनबीए’साठी आवश्यक पूर्तता न करणाऱ्या १५६ महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठास हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. ‘महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्था पुढील ६ महिन्यांमध्ये ‘नॅक’ मूल्यांकन / पुनर्मूल्यांकन विद्यापीठास अहवाल सादर करेल’, या आशयाचे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील महाविद्यालय संलग्नता व विकास विभागाकडे (खोली क्रमांक २०७) मंगळवार, २७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जमा करण्यात यावे. सदर हमीपत्र प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित झाले नाहीत, तर सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच पुढील ६ महिन्यांच्या कालावधीत नॅक मूल्यांकन न केल्यास संबंधित महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.