मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुंबई विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिली आहे.
तसेच १४ जून रोजी जाहीर झालेल्या पाचव्या प्रवेश यादीनुसार प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्या असल्यास महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश यादी जाहीर करावी आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा, असेही मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असणार आहे.
तसेच अधिक माहितीसाठी https://mu.ac.in/ या मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.