मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत बोगस लसीकरण शिबीर घेण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आपल्याला बोगस लस दिली गेली असल्याचा आरोप करत लसीकरण घोटाळा होत असल्याचा दावा सोसायटीतील नागरिकांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणात रुग्णालयांनी खुलासा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

३० मे रोजी हिरानंदानी सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. राजेश पांडे यांने सोसायटीतील सदस्यांची भेट घेऊन स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं होतं. तसंच सोसायटीत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचं सांगितलं होतं. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली होती.

लस दिल्यानंतर नागरिकांना लसीकरण झाल्याचा मेसेज आला नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्र देण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सुरूवातीला नागरिकांना वेगवेगळ्या तारखा आणि ठिकाणं असलेली प्रमाणपत्र देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

संबंधित वृत्त- मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ

रुग्णालयांचं म्हणणं काय?

लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्र इत्यादी. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका आणखी बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं होतं.

हेही वाचा- ‘कोविन’सक्ती रद्द; १८ वर्षांवरील सर्वाना थेट केंद्रावर लसलाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध केलं होतं. ज्यात म्हटलं होतं की, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने कांदिवलीतील हाऊस सोसायटीतील नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र दिली गेली असल्याचं अलिकडेच निदर्शनास आलं आहे. नागरी सोसायट्यांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण शिबीर आयोजित करत नाही, हे स्पष्ट करत असून, या प्रकरणी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि तक्रारही नोंदवत आहोत,” असं नानावटी रुग्णालयाने स्पष्ट केलं होतं.