मुंबई : मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने मार्गी लावाव्यात आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन मार्गी लावावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वांद्रे मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोठ्या संख्येने झोपडीधारक आणि वंचितचे कार्यकर्ते जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांना दिले. कल्याणकर यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत रखडलेले प्रकल्प मार्गी लागत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे वंचितकडून यावेळी जाहीर करण्यात आले.

झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी झोपु प्राधिकरणातर्फे झोपु योजना राबविल्या जात आहेत. मात्र शेकडो झोपु प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत, अनेक ठिकाणी विकासकांनी कामे अर्धवट ठेवली आहेत, काहींनी झोपडीधारकांची घरभाडी थकवली आहेत. यासह अन्य प्रकारच्या तक्रारी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने वंचितकडून झोपु प्राधिकरण, सरकारकडे पाठपुरावा करूनही तक्रारी मार्गी लावण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नव्हती. त्यामुळे वंचितने बुधवारी झोपु मुख्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी २ वाजता वांद्रे येथील झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोठ्या संख्येने झोपडीधारक आणि वंचितचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी सरकार, झोपु प्राधिकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बराच वेळ या ठिकाणी आंदोलन सुरू होते. शेवटी कल्याणकर यांनी वंचितच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. यावेळी शिष्टमंडळांनी आपली भूमिका मांडून रखडलेले झोपु प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत, घरभाडे थकबाकी तात्काळ द्यावी, गैरवर्तन-गैरप्रकार करणाऱ्या विकासकांविरोधात कठोर कारवाई करावी, झोपडीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे, झोपु योजनांची प्रगती जाहीर करावी, विकासक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताला आळा घालावा, गरज असल्यास रखडलेले प्रकल्प झोपु प्राधिकरणाने ताब्यात घेऊन मार्गी लावावेत, आदी मागण्या कल्याणकर यांच्यासमोर मांडल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी दिली.

वंचितकडून यावेळी मागण्यांचे निवेदन कल्याणकर यांना देण्यात आले. सर्व मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व तक्रारी दूर करून झोपु योजना मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन दिल्याचेही सोहनी यांनी सांगितले. तर जोपर्यंत झोपडीधारकांचे योग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत वंचितचा पाठपुरावा आणि लढा सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.