मुंबई : विक्रोळीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे विविध भागात धुळीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिक आरोग्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. विक्रोळीतील वाढत्या धुळीमुळे होणाऱ्या प्रदुषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी नुकतेच एस विभागातील सहाय्यक आयुक्तांना प्राणवायू सिलिंडर, मुखपट्टी देऊन निषेध व्यक्त केला. तसेच, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
विक्रोळीत सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात विशेषतः कन्नमवार नगरात धुळीची समस्या निर्माण झाली आहे. बांधकामाचा कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. अनेक नागरिकांना श्वसनासह डोळ्याचे आणि त्वचेचे विकार होत असल्याचा दावा समाजसेवक डॉ. योगेश भालेराव यांनी केला. यापूर्वी दोन वेळा हवा प्रदुषणाबाबत महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली. आंदोलनही करण्यात आले. मात्र, पालिकेकडून याबाबत काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात त्यांनी एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना प्राणवायू सिलिंडर, मुखपट्टी देऊन निषेध केला. धुळीची समस्या कमी करण्यासाठी बांधकाम विकासकांसाठी ठोस नियम बनवावेत, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सहाय्यक आयुक्तांकडे केली. स्थानिक नागरिकांना श्वसनासंबंधित आजार जडत असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विक्रोळीत पूर्वीपासूनच क्षेपणभूमीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता धुळीचीही समस्या निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे डॉ. भालेराव यांचे म्हणणे आहे.
