मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (Lane Marking), वाहतूक बेट (Traffic Iland), वाहतूक दिवे (Signal) उभारणीची कामे प्रगतिपथावर असून ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा ३१ मे २०२५ अशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी निश्चित केली होती. या अनुषंगाने विहित कालावधीत पुलाची सर्व मुख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे.
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर, तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळया स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत.
या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२, तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारण्यात आले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकांवरील कॉंक्रीट, मास्टिक, ध्वनीरोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers) आदी सर्व कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत.
येत्या दोन दिवसांत एका बाजूकडील ध्वनिरोधक (Noise Barriers), रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणी (Lane Marking) आदी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र तयार केले आहे. सध्या वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. वाहतूक दिवे अर्थात सिग्नल बसवायचे काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.