स्त्री मॉडेल असलेली चित्रे ‘मॅग्नेटिक मून्स’ या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन सध्या सुरू असून चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी सहज सुंदरता, सात्त्विकता, तेज यांचा साक्षात्कार या चित्रांतून घडविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तववाद आणि नैसर्गिकता या अंगाने जाणारी चित्रे आहेत. या चित्रांमधून माजघरात, घरातल्या आतल्या भागात वीणकाम, कलाकुसर, रंगकाम करणाऱ्या तरुणी दिसतात, त्यांच्या हातातील वस्तू, त्यांनी परिधान केलेली वस्त्र प्रावरणे, त्यांचे दागदागिने यातले बारकावे चित्रांतून दाखविले आहेत.
११ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
जहांगीर कला दालन, काळा घोडा
‘एक शाम पंचमदा के नाम’
राहुल देव बर्मन यांच्या गाण्यांवर आधारित ‘एक शाम पंचमदा के नाम’ हा कार्यक्रम स्वरगंधार या संस्थेतर्फे होत आहे. शैलजा सुब्रमण्यम, सोनाली कर्णिक, आलोक काटदरे आणि आशीष श्रीवास्तव हे गायक यात गाणी सादर करणार असून १६ वादकांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र रसिकांशी संवाद साधणार असून अविनाश चंद्रचूड यांचे संगीत संयोजनाची आघाडी सांभाळणार आहेत. संपर्क- मंदार कर्णिक: ९८२०७५७४३५.
दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले
शनिवार, ९ जानेवारी, रात्री ८.३० वाजता
‘पं. सी. आर. व्यास वंदना’
ज्येष्ठ आणि प्रख्यात गायक पंडित जसराज आणि मोहनवीणाप्रसारक पंडित विश्वमोहन भट्ट, गायक गणपती भट आणि प्रख्यात संतूरवादक पंडित सतीश व्यास हे मान्यवर कलाकार ‘सी आर व्यास वंदना’मध्ये आपली कला सादर करणार आहेत. विख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित सी. आर. व्यास यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त आणि त्यांनी िहदुस्थानी शास्त्रीय संगीताला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विनामूल्य प्रवेशिकांसाठी संपर्क- ऱ्हिदम हाऊस- ४३२२२७२७ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह- २४४६५८७७.
– ९ व १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता
– स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क
आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन
विविधरंगी विविध जातींच्या फुलांचे नेत्रसुखद प्रदर्शन पाहणे, अनुभवणे, निसर्गाची किमया याचि देहा याचि डोळा अनुभवण्याची संधी महानगरीय माणसांना फारच कमी वेळा मिळते. म्हणूनच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी आणि मुंबई रोझ सोसायटी यांनी आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. विविधरंगी गुलाबांव्यतिरिक्त ऑर्किड्स, लिलियम्स, कार्नेशन्स, हेलिकॉनिअस अशा जगभरातील अनेकविध जातींची फुले या प्रदर्शनात पाहायला मिळतील. नागपूर, जबलपूर, कोलकाता इत्यादी शहरांतील फुलांबरोबरच थायलंड, मलेशिया, हॉलंड अशा देशांतील फुलेही पाहायला मिळतील. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेल्या ४ हजार चौरस फूट आकारात उभारण्यात आलेली उभी हरित भिंत पाहायला मिळेल. त्याशिवाय विविध प्रकारचे बोन्साय प्रदर्शनात मांडण्यात येतील.
९ व १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत
मियाल कॉलनी, सुबा हॉटेलशेजारी, पी अॅण्ड टी कॉलनीसमोर, सहार मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व.