मुंबई : टॅंकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात जोगेश्वरी येथे झाला. अपघात झाला त्यावेळी टॅंकर चालक मोबाइलवर बोलत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोगेश्वरी पोलिसांनी याप्रकरणी टॅंकर चालकाला अटक केली.

आशा जाधव (६३) आपल्या २१ वर्षीय मुलासोबत जोगेश्वरी पूर्व येथे राहत होत्या. त्या सोमवार, ८ सप्टेंबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगरमधील एका नातेवाईकाच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांचा १९ वर्षीय पुतण्या आदित्य जाधव दुचाकीवरून त्यांना घरी सोडण्यासाठी निघाला होता. ते जोगेश्वरी (पूर्व) येथील जे.ई.एस. शाळेसमोरील रस्त्यावरून जात होते.

दुपारी १ च्या सुमारास एका पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे आशा जाधव खाली पडल्या. टँकरचे पुढील चाक आशा जाधव यांच्या डावा हातावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्या बेशुद्ध पडल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने आदित्यने त्यांना जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅंकर चालक मोबाइलवर बोलत होता

आरोपी चालक हा अपघाताच्या वेळी मोबाइलवर बोलत होता, असे प्रत्यक्षदर्शी आदित्यने सांगितले. मी हॉर्न वाजवला, पण चालकाने दुर्लक्ष केले. मोबाइलमुळे त्याचे लक्ष रस्त्यावरील वाहतुकीकडे नव्हते आणि त्याने बेपर्वाईने वाहन चालवले, असा आरोप आदित्यने केला आहे.

टँकरचालकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेऊन जोगेश्वरी पोलीस ठाण्यात आणले. आरोपी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) (निष्काळजीपणे केलेल्या कृत्यामुळे मृत्यू), कलम २८१ (निष्काळजी वाहन चालवून मानवी जीवितास किंवा इजा होण्याची शक्यता निर्माण करणे), तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चालक अंधेरीत राहतो.

बेदरकार टॅंकरचे वाढते बळी

मुंबई व उपनगरात बेदरकारपणे धावणाऱ्या टँकरमुळे अपघात वाढत आहेत. यामुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई–आग्रा महामार्गावर जुलै २०२५ मध्ये रासायनिक टँकरने एका वाहनाला धडक दिली होती. या अपघातात अंधेरीतील सावंत कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला होता.

मार्च २०२५ मध्ये कोपरखैरणे येथे टँकरच्या धडकेत २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मे महिन्यात कांजुरमार्ग येथे टँकरच्या अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला होता. जून २०२४ मध्ये बोरिवली येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर रासायनिक टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार झाले. एप्रिल २०२४ मध्ये विरार टँकरच्या धडकेतपाच वर्षीय मुलगा व त्याची आजी ठार झाले होते.