दोन वर्षांपासून राणीच्या बागेत वास्तव्याला असलेल्या हम्बोल्ट पेंग्विनपैकी मिस्टर मोल्ट आणि फ्लिपर या जोडीनं बुधवारी पिलाला जन्म दिला. भारतात जन्मलेला हा पहिला पेंग्विन आहे. मात्र या पिलाला पाहण्यासाठी मुंबईकरांना ३ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पिलाला पिसे येऊन पोहण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणूनच पुढचे काही महिने त्याची विशेष काळजी घेता येणार आहे. पण, तोपर्यंत मुंबईकरांना वाट पाहावी लागणार आहे.

मादी फ्लिपर मासे खाऊन त्याच्या पचनानंतर शरीरात निर्माण झालेला चोथा बाहेर काढून पिलाला भरवत आहे. फ्लिपर, मोल्ट आणि पिलाच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या घरटय़ाभोवती कुंपण घालण्यात आले आहे. ४० दिवस मोल्ट आणि फ्लिपर आळीपाळीने अंडे उबवत होते. तर मादी फ्लिपर गेले पाच दिवस काहीही न खाता पिता अंड उबवत होती.

पिलाचे सध्याचे वजन ७५ ग्रॅम तर उंची १२ ते १५ सेंटीमीटर इतकी आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्या मातेच्या ताब्यात देण्यात आले. ज्याप्रमाणे अंडय़ातून पिलू बाहेर पडण्याची प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने करण्यात आली. तसेच बाळाचे संगोपन देखील त्याचे संगोपन देखील त्याचे आई-वडील मोल्ट आणि फ्लिपर करणार आहेत.

माहितीपट बनवण्याचा विचार
‘भारतातील सर्वात पहिल्या पेंग्विन पिलाचा जन्म राणीबागेत झाल्याने हीआनंदाची बाब आहे. पिलाच्या आगमनाची माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिली आहे. फ्लिपरने अंडे दिल्यापासून ते त्यातून पिलू बाहेर पडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण उपलब्ध असल्याने त्यावर माहितीपट तयार करण्याचा विचार करू,’ असे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.