मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी सोमवारीही दक्षिण मुंबईमधील मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. अनेक तरुण- तरुणींचे गट राष्ट्रध्वज फडकवत समुद्रकिनाऱ्यावर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत फिरत होते, तर मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यालगतच्या पदपथावर काही संस्थांतर्फे पथनाटय़, कवायतींचे आयोजनही करण्यात आले होते.

शासकीय, तसेच खासगी इमारती आणि ‘राणीचा रत्नहार’ परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. देशभक्तीपर गीत, तसेच देशप्रेमाच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता. त्याचबरोबर या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेने ४१ लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील असंख्य इमारतींवर राष्ट्रध्वज फडकताना दिसत होता. स्वातंत्र्यदिनी सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ शासकीय कार्यालयेच नव्हे तर खासगी संस्था, संघटना, गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये सकाळीच ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर मंत्रालय, मुंबई महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया यांसह दक्षिण मुंबईतील शासकीय आणि खासगी इमारतींवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या इमारती, परिसराचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येने

दक्षिण मुंबईत दाखल झाले होते. अनेक तरुण-तरुणी गटागटाने मरिन ड्राइव्ह परिसरात दाखल होत होते. ध्वज फडकवत, देशभक्तीपर गीते आणि घोषणाबाजी करीत नागरिकांनी हा परिसर दुमदुमून टाकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस सज्ज होते.