scorecardresearch

Premium

मुंबईकरांना मिळणार दिलासा?; लस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मिळू शकते परवानगी

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे

File Image

करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. मात्र, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे. अशातच मुंबई महापालिकेने देखील मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात कोविड -१९ वरील लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र शासन अंतिम निर्णय घेईल असे सांगण्यात आले. मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पत्र लिहून विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल असलेल्यांना आणि पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना सूट देण्यात यावी अशी विनंती केली होती.

हे ही वाचा >> वकिलांना लोकल प्रवासाची मुभा नाहीच!

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईतील सध्याच्या करोनाच्या परिस्थितीबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. “सद्या कोविड -१९ दर पाहिल्यास आपण सहजपणे म्हणू शकतो की सध्याच्या क्षणी आम्ही अतिशय आरामदायक स्थितीत आहोत. आमचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता जवळपास एक हजार दिवसांवर गेला आहे,” असे चहल म्हणाले.

“मुंबईत फक्त ४०० ते ५०० रुग्ण सापडत आहेत आणि आम्ही दररोज सुमारे ४०,००० चाचण्या घेत आहोत. शहरात मृत्यूंची संख्याही खूपच कमी आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची संख्या शून्यावर आणणे कठिण आहे. पण सध्याची परिस्थिती स्थिर आहे,” असे चहल म्हणाले. “लोकल ट्रेनमध्ये आम्ही बहुतेकदा रॅपिड अँटीजेन टेस्ट घेत असतो. सध्याच्या घडीला प्रवाश्यांसाची आरटी-पीसीआर चाचणी घेणे शक्य नाही. पण हेदेखील दुसर्‍या टप्प्यात घेण्यात येईल” असे चहल यांनी सांगितले.

काही दिवसापूर्वी भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. “लोकल सुरु करण्यासंदर्भातील जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला वाटेल आता करोनाची स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणं गरजेचे आहे. राज्याने त्या ठिकाणचा अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही,” असे दानवे म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbaikars vaccinated people can get local travel permission abn

First published on: 14-07-2021 at 12:22 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×