BEST Bus Fare Hike : मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता. त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत.

बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात गेला असून संचित तूट सहा हजार कोटींच्या पलिकडे गेली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात भाडेतत्त्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून बेस्टचे तिकिट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला. बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता.

दरम्यान, बेस्टच्या महाव्यवस्थापक एस श्रीनिवास यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच बेस्टच्या भाडेवाढीचे सुतोवाच केले होते. तसा प्रस्तावही पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. मात्र पालिका प्रशासनाने त्यावर काहीही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता बेस्टने या भाडेवाढीला मंजूरी दिली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या बेस्टला वार्षिक ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ जाल्यास वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी असेल भाडेवाढ

अंतर (किमी) सध्याचे भाडे प्रस्तावित भाडे
५ ५ रुपये १० रुपये

१० १० रुपये १५ रुपये

१५ १५ रुपये २० रुपये

२० २० रुपये ३० रुपये

वातानुकूलित बस

अंतर (किमी) सध्याचे भाडे प्रस्तावित भाडे

५ ६ रुपये १२ रुपये

१० १३ रुपये २० रुपये

१५ १९ रुपये ३० रुपये

२० २५ रुपये ३५ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात वर्षांनी भाडेवाढ

बेस्ट उपक्रमाने २०१८ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा बेस्टचे किमान भाडे ८ रुपये होते. तर वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये होते. त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. बेस्टचे साधारण बसचे भाडे पाच रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये इतके कमी करण्यात आले होते. बेस्टच्या भाड्यात कपात झाल्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले पण बेस्टचा महसूल घसरला होता. तसेच बेस्टकडे पाच रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती. २०१९ पासून बेस्टचे किमान भाडे पाच रुपयेच असून त्यात वाढ करावी अशी मागणी प्रशासनाकडून वारंवार होत होती. मात्र निवडणूकीच्या नावाखाली ही भाडेवाढ होऊ शकली नाही. बेस्टला मात्र भाडेकपातीमुळे प्रंचड तोटा सहन करावा लागला.