मुंबई : मुंबईमधील उंचावरील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत असतानाच डोंगराळ भागातील श्रमिकांच्या वस्त्या मात्र तहानलेल्याच आहेत. गेली १७-१७ वर्षे श्रमिक वस्त्यांमधील नागरिकांची तहान भागविणे महापालिकेला शक्य झालेले नाही. पुरेसे पाणी मिळविण्यासाठी पालिकेच्या घाटकोपर (एन विभाग), कुर्ला (एल), भांडूप (एस) येथील विविध परिसरामधील विशेषतः डोंगराळ भागात सुमारे १७ ते १८ वर्षांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाण्यासाठी लढा देण्याच्या विचारात हे नागरिक आहेत.

मुंबईकरांना उत्तम नागरी सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असलेल्या महानगरपालिकेने विविध विकसकामे आणि नवनवीन पायाभूत प्रकल्पांवर भर दिला आहे. मात्र, मुंबईतील अनेक भागातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात पालिकेला अद्यापही पुरते यश आलेले नाही.

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काही राज्यांपेक्षाही मोठा आहे. मुंबई महानगरपालिकेने २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात पाणीपुरवठ्यासह विविध विभागांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. मात्र, आजही मुंबईमधील अनेक भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. मुंबईतील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांची तहान पूर्णपणे भागविणे पालिकेला शक्य झालेले नाही. महानगरपालिकेच्या विभाग एन व एल विभागांमध्ये तब्बल १७ – १८ वर्षांपासून नागरिक पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठ्याचा अवधी कमी असल्याने सर्व कुटुंबियांना पाणी मिळत नाही. अनेक नागरिकांना पाण्यासाठी रात्री जागरण करावे लागत असून नोकरदारांची परवड होत आहे. पाणीपुरवठ्यावरून नागरिकांमध्ये भांडणे, वाद होण्याचेही प्रमाण वाढत आहे.

एन विभागातील काजूटेकडी, रामजी नगर, आझाद नगर, अकबरलाला कंपाउंड, पारशीवाडी, सोनिया गांधी नगर, खंडोबा टेकडी, विक्रोळी पार्क साईट, वर्षा नगर, आनंद नगर, नागोबा डोंगर, सिद्धार्थ नगर आणि आंबेडकर नगर, सुरक्षा नगर, एल विभागातील असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायण नगर, हिल नंबर ३, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग, संघर्ष नगर, भांडुपमधील हनुमान नगर, श्याम नगर, आरे वस्त्या, मोराचा पाडा, युनिट ९, ३, गोराईतील गौतम नगर, बोरिवली, दहिसरमधील विविध परिसरात नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची समस्या निवारणासाठी महापालिकेकडे अनेकदा लेखी निवेदने, तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी मोर्चे आणि आंदोलनेही करण्यात आली. मात्र, नागरिकांचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

डोंगराळ भागात पाणीपुरवठा करणे फार आव्हानात्मक नाही. मलबार हिल, महेंद्र पार्क, आरे पार्क आदी डोंगराळ भागात व्यवस्थित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अन्य डोंगराळ भागातील श्रमिक लोकवस्त्यांमध्ये वर्षानुवर्षे नागरिकांना पुरेशा पाण्यासाठी झगडावे लागत आहे. महापालिका उच्चभ्रू वस्त्यांना पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिक प्राधान्य देत आहे. पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ, कल्पना, पैसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. मात्र, तरीही डोंगराळ भागातील श्रमिक वस्त्यांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई केली जात आहे. शिवाय, यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.सीताराम शेलार,अध्यक्ष, पाणी हक्क समिती

एन व एल विभागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक तक्रार केल्या. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. या भागातील बहुतांश जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यात मोठी दिरंगाई होत आहे.ॲड. अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार

एल आणि एन विभागातील डोंगराळ भागाला घाटकोपर ऊर्ध्व जलाशयातून पाणीपुरवठा होतो. संबंधित भागातील डोंगराळ भागात ऑक्सिलरी सक्शन टाक्या व पंपिंगद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच, पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या व जलवाहिन्या सुमारे २५ वर्षे जुन्या असून वाढलेल्या लोकसंख्येसाठी कमी पडत आहे. त्यामुळे संपूर्ण डोंगराळ भागाचा टीएसएस करून नियोजन विभागाने पाणीपुरवठा यंत्रणेत पुनर्रचना केली आहे. तसेच अन्य विविध कामे प्रगतीपथावर आहेत. शिवाय, पवई, घाटकोपर येथील सेवा जलाशयाच्या पुरवठ्यात वाढ करण्यात आल्यामुळे आता एल व एन विभागातील तक्रारींचेही प्रमाण कमी झाले आहे. अभिजित बांगर,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त