गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असली तरी सध्या भाजपला असलेल्या अनुकूल वातावरणामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी कोणताही वाद नको म्हणून सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग केला जाऊ शकतो. कालांतराने मात्र सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची तसेच बेरजेचे राजकारण करण्याची क्षमता असलेल्या विनोद तावडे यांचा चेहरा पुढे आणला जाईल, अशी चिन्हे आहेत.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राज्य भाजपमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही जागा मग मुंडे यांनी घेतली. मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी जाणवणार आहे. राज्य भाजपमध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे हे पहिल्या फळीतील नेते आहेत. मुंडे यांच्या तुलनेत पहिल्या फळीतील या नेतेमंडळींना तेवढा जनाधार नाही. यातील गडकरी आता राष्ट्रीय राजकारणात स्थिरावले आहेत.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली असली तरी पक्षाला पुढे घेऊन जाण्याबाबत त्यांच्या काही मर्यादा आहेत. ‘केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ ही घोषणा काही जणांनी दिली होती. सर्वाना बरोबर घेऊन जाणे, राज्याच्या राजकारणाची नाडी ओळखणे व त्यानुसार निर्णय घेणे, सर्व समाजघटकांना बरोबर घेणे हे गुण राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे आवश्यक असतात. देवेंद्र फडणवीस हे राज्य भाजपचे प्रमुख असले वा दिल्लीतील नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल चांगले मत असले तरी फडणवीस यांच्याकडे हे सारेच गुण नाहीत. पक्षाचे नेतृत्व करणाऱ्याला महाराष्ट्र राजकीयदृष्टय़ा समजणे हे फार महत्त्वाचे असते. नेमकी ही बाब फडणवीस यांच्याबाबत प्रतिकूल ठरू शकते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना प्रकृती तेवढी साथ देत नाही तसेच जनमानसात त्यांना तेवढे स्थान नाही.
या सर्व नेत्यांच्या तुलनेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उजवे ठरतात. विद्यार्थिदशेतून राजकारणात आलेल्या तावडे यांना तेवढा जनाधार नसला तरी राजकारणात आवश्यक असणारे सारे गुण त्यांच्याजवळ आहेत. सर्व पक्षांमधील नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. बेरजेचे राजकारण करण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. विशेष म्हणजे गडकरी यांचा त्यांना आशीर्वाद आहे. पक्ष तावडे आणि फडणवीस या दोघांकडे संयुक्तपणे नेतृत्व सोपविण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाजन यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र भाजपला सावरण्यास बराच वेळ लागला होता. आता तशी परिस्थिती नाही. तरीही मुंडे यांची पोकळी भाजपला महाराष्ट्रात तरी नेहमीच जाणवेल.
मुंडे यांच्या निधनाने सेनेचेही नुकसान
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने केवळ भाजपचेचे नव्हे तर शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे. महायुतीला राज्यात सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असताना जागावाटपासह मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाल्यास ते मिटविण्याची ताकद ही केवळ गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच होती, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सेना-भाजपमध्ये यापूर्वी जेव्हा मतभेद झाले अथवा बाळासाहेब नाराज होत त्यावेळी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन हेच सेनाप्रमुखांची समजूत काढत असत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व गोपीनाथ मुंडे यांच्यात उत्तम संवाद होता.
