मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कारकीर्दीला आता उतरती कळा लागल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. 
मुंडे यांच्या उमेदवारीसंदर्भातील फेरविचार याचिका गुरुवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सांवत यांनी फेटाळली. यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतून मुंडे बाद झाले आहेत. मुंडेंची याचिका फेटाळल्यामुळे आता अध्यक्षपदासाठीचे एकमेव उमेदवार आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा विजय निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे मुंडेच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीलाही मोठा धक्का बसला आहे. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८ कोटी रुपये खर्च केल्याचे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी केल्यामुळे त्यांना पुढील लोकसभा निवडणूकही लढवता येणार नसल्याची शक्यता आहे. जर निवडणूक आयोगाने त्यांना दोषी ठरवले, तर त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.