मुंबई : बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. फडणवीस यांनी बेस्ट वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन बेस्ट महाव्यवस्थापक, पालिका आयुक्त आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी कामगार सेनेन फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाची वाढत चाललेली तूट, कमी होत चाललेला बसताफा, तसेच वाढत्या अपघातांच्या घटना यामुळे बेस्टची दुर्दशा झाली असून त्यावर तोडगा काढावा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. बेस्टचे खासगीकरण थांबवावे, बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी व बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवावा आदी मागण्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. मात्र पालिका आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही.

हेही वाचा…सेंट जॉर्जमधील डॉक्टरांनी घडवून आणली मायलेकरांची भेट, १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र बेपत्ताच

कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघातामुळे बेस्टच्या परिवहन विभागातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या विषयावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर सोमवारी १६ डिसेंबरला शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन भाडेतत्वावरील बसगाड्या बंद कराव्या, अशी मागणी केली. तसेच बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवण्याची मागणी केली. यावेळी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, माजी बेस्ट समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल कोकीळ उपस्थित होते. कामगार सेनेच्या शिष्टमंडळासोबत पालिका आयुक्तांनी चर्चा केली. मात्र बेस्टची जबाबदारी घेण्यास आयुक्तांनी नकार दिल्याचे अनिल कोकीळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आयुक्तांच्या दालनातून बाहेर आल्यावर कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांचा निषेध केला. बेस्टमध्ये भाडेतत्त्वावरील गाड्या घेण्याबाबतचा करार तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केला होता. तो कायदेशीर नसल्याचे आयुक्तांनी सांगितले, अशीही माहिती कोकीळ यांनी दिली. त्यामुळे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावरून पालिका आयुक्तांचा निषेध केला.

हेही वाचा…मुंबईची हवा खालावलेलीच, गारठा व प्रदूषकांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका आयुक्तांनी मदत करण्यास नकार दिल्यामुळे कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून संयुक्त बैठकीची मागणी केली. खासगीकरणामुळे बेस्टला आर्थिक घरघर लागली आहे. तसेच खासगीकरण झाल्यापासून बेस्टचे जीवघेणे अपघात होत आहेत. त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी एक संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.