निर्बिजीकरण करुन भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात पालिका यशस्वी ठरलेली नाही. उलटपक्षी मुंबईत मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असून त्यांची धरपकड करण्यासाठी आता पालिका दोन वाहने भाडेतत्वावर घेणार असून त्यासाठी पालिकेला ९२.४७ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. निर्बिजीकरणाद्वारे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पालिका करीत आहे. मात्र अद्याप पालिकेला त्यात पुरेसे यश मिळालेले नाही. रात्री-अपरात्री रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांना अथवा दुचाकीस्वाराला या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो.
मुंबईमध्ये १९९४ ते २०१५ या काळात तब्बल १३,१२,१६० जण श्वानदंशामुळे जखमी झाले असून त्यापैकी ४२९ जणांना प्राण गमवावे लागले. जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ या काळात ४६,६४७ जणांना कुत्रे चावले आणि त्यापैकी पाच जण दगावले. आजही या कुत्र्यांची मुंबईकरांच्या मनात दहशत कायम आहे. त्यामुळे पालिकेने आता या कुत्र्यांची धरपकड करण्यासाठी दोन वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा स्वैरसंचार सुरू असतो. त्यामुळे रात्रीत त्यांची धरपकड करण्यात येणार आहे. नागरिकांनी तक्रार करताच रात्रीच्या वेळी संबधित विभागातील कुत्र्यांना पकडण्यात येणार आहे. भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या या दोन गाडय़ा शहर आणि उपनगरात आठ तासांची एक अशा तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहे. या वाहनाच्या एका पाळीसाठी २,३७५ रुपये भाडे देण्यात येणार आहे. मात्र गाडी उपलब्ध करण्यात कंत्राटदार अपयशी ठरल्यास त्याला प्रत्येक पाळीसाठी २,५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2015 रोजी प्रकाशित
भटकी कुत्री पकडण्यासाठी पालिका भाडय़ाने वाहने घेणार
मुंबईमध्ये १९९४ ते २०१५ या काळात तब्बल १३,१२,१६० जण श्वानदंशामुळे जखमी झाले
Written by मंदार गुरव

First published on: 20-12-2015 at 02:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipalities will hire vehicles for catching stray dogs