मुंबई : भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ घडवत अभिजात संगीत निर्मितीची कास धरणारे संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
गेली काही वर्षे ते वृद्धापकाळामुळे उद्भवणाऱ्या आजारांशी झगडत होते. हिंदी लोकप्रिय चित्रपट संगीताची रुळलेली वाट सोडून त्यांनी नेहमी काम केले. जाहिरातींसाठी संगीत देण्यापासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांचा कलाप्रवास प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना संगीत देत समांतर चित्रपटांच्या साथीने बहरत राहिला. भारतात पाश्चात्य शास्त्रीय संगीताची रुजवात करणारे अग्रणी संगीतकार म्हणून वनराज भाटिया नावाजले गेले. राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्माश्री पुरस्कारांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकु र’ या चित्रपटाला संगीत देण्यापासून त्यांनी चित्रपट
संगीत कारकिर्दीची सुरूवात के ली. भारतीय चित्रपट क्षेत्रातील समांतर चित्रपट चळवळीच्या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी प्रामुख्याने काम के ले. नव्वदच्या दशकांत ‘अजूबा’, ‘दामिनी’सारख्या चित्रपटांना त्यांनी पाश्र्वासंगीत दिले होते. त्यांचे संगीतक्षेत्रातील काम हे अत्यंत वेगळे होते. त्यांच्या संगीताचे चाहतेही अनेक आहेत. त्यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रातील एक अभ्यासू आणि स्वतंत्र विचारसरणी असलेला प्रतिभावंत संगीतकार हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.
अखेरचा काळ त्रासदायक…
गेले काही वर्ष त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अंथरूणाला खिळून असलेल्या भाटिया यांना आर्थिक चणचणीचाही सामना करावा लागला. घरातील संग्राह््य वस्तू विकू न पैसे उभे करण्याचा प्रयत्नही त्यांनी के ला. गीतकार जावेद अख्तर यांनी ‘आयपीआरएस’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली होती.
सात हजार जाहिराती… लंडन येथील ‘रॉयल अकॅ डमी ऑफ म्युझिक’ आणि पॅरिस येथील संगीत विद्यालयात संगीताचे धडे गिरवल्यानंतर वनराज भाटिया मायदेशात परतले. इथे त्यांनी जाहिरातींना संगीत देण्यापासून सुरुवात के ली. त्यांनी आतापर्यंत ७ हजार जाहिरातींसाठी संगीत दिले.
मालिकांचे संगीत…
त्यांनी काही मालिकांच्या शीर्षकगीतांनाही संगीत दिले होते. ‘वागळे की दुनिया’, ‘बनेगी अपनी बात’, ‘भारत एक खोज’ आणि गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ सारख्या प्रसिध्द मालिकांनाही त्यांनी संगीत दिले होते. ‘तमस’साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
गाजलेले चित्रपट… ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘द्रोहकाल’, ‘जाने भी दो यारो’, ‘जुनून’, ‘३६ चौरंगी लेन’, ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘खामोश’ सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.