देशातील प्रत्येकजण बेईमान नाही, सरकारने सामान्य जनतेवर विश्वास दाखवला पाहिजे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते गुरूवारी मुंबईत बोलत होते. यावेळी उद्धव यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या सामान्य जनता होरपळत असल्याचे सांगितले. तसेच सरकारने जिल्हा बँकांवर रोकड स्वीकारण्याची घातलेली बंदी उठवली पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी बँकाच अस्तित्त्वात नाहीत. मग त्या लोकांनी काय करायचे?, असा सवाल उद्धव यांनी विचारला. काळ्या पैशाविरोधातील लढाईत आम्ही सरकारबरोबर आहोत. मात्र, त्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये. नोटाबंदीचा निर्णय चांगला असली तरी त्याच्या अंमलबजावणीची पद्धतही चांगली हवी, असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून शिवसेनेने नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. दिल्लीत लोहपुरुषाची गरज होती, पण याच लोहपुरुषाने देशातील १२५ कोटी जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर आणले. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करुन जनतेला भूककंगाल करणे हे जालियनवाला बागपेक्षाही भयंकर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

तत्पूर्वी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न केले पाहिजेत, अशी विनंती आपण राजनाथ सिंह यांना केल्याचे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव यांनी गुरूवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी बाळासाहेबांच्या स्मारक उभारण्याची वाटचाल व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन घाईत केले जाणार नसल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले.