मुंबई : मालाड येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांच्या कामचुकारपणाचा फटका रुग्णांना बसत आहे. जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णांच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी त्यांना प्राथमिक उपचार करून अन्य रुग्णालयामध्ये पाठविण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये घडत आहेत. यामुळे अनेक रुग्णांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत असल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णांची रुग्णांची नोंद करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात वैद्यकीय कायदेशीर नोंदणीपुस्तक किंवा आपत्कालीन पोलिस अहवाल पुस्तकामध्ये (ईपीआर) नोंद करण्यास मालाडमधील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयातील डॉक्टरांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर जखमी रुग्णांवर लघु शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्यांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून घडत आहेत.
मालाडमधील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेने एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय बांधले आहे. मात्र त्या रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांच्या कामचुकारपणामुळे तेथील रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग असूनही जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णांवर फक्त प्राथमिक उपचार केले जातात.
मागील काही दिवसांपूर्वी काम करताना उजव्या हाताचे बोट गंभीररित्या कापल्याने ३९ वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या रुग्णालयाच्या बोटाला झालेल्या जखमेला टाके घालण्याची आवश्यकता होती. मात्र शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अन्य रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याचप्रमाणे एका २२ वर्षीय तरुणालाही अशाच प्रकारे जखम झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र त्याच्या हाताला मलमपट्टी करून त्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात जाण्यास सांगितले.
मागील आठवड्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याने रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभाग असूनही नागरिकांवर उपचार करण्यास डॉक्टरांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांना मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सध्या अशा प्रकारची घटना रुग्णालयात घडल्याची माहिती नाही. मात्र कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारू नयेत. तसेच त्याला अन्य रुग्णालयात पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना सर्व डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. – डॉ. अरविंद उगळे, वैद्यकीय अधीक्षक, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय
