मुंबई : विमानात धूम्रपान करणाऱ्या एका प्रवाशाविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैरोबी- मुंबई प्रवासादरम्यान हा प्रकार घडला होता. इंडिगो एअरलाईन्सचे एक विमान (६ ई १८५४) शनिवार १८ जुलै रोजी नैरोबीहून मुंबईला येत होते. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी दुपारी सुमारे अर्धा तास अवधी होता. त्यावेळी विमानातील एक कर्मचारी (केबीन अटेंडंट) प्राची लांडगे यांना प्रसाधनगृहात धूराचा वास येवू लागला. त्यावेळी प्रवासी ठाकोरभाई पाठक (६६) प्रसाधनगृहातून बाहेर पडताना दिसले. याबाबत त्यांनी पाठक यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी विमानात धूम्रपान केल्याचे कबुल केले.
हा प्रवासी नैरोबूहीन प्रवास करीत होता. अन्य हवाई कर्मचारी (केबीन क्रू मेंबर) सिध्दी बने (३३) आणि मनिषा कांडपाल (२८) यांनीही पाठक यांच्याकडे विचारणा करून खात्री केली. या प्रकाराबाबत वैमानिक दिव्या पटोल यांना माहिती देण्यात आली.
सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नियमानुसार विमान सुरू होण्याआधी आणि विमान सुरू असताना विमानात धूम्रपान करण्यास बंदी आहे. तशी माहिती प्रवाशांना वेळोवेळी दिली जाते. मात्र या नियमांचा भंग करून ठाकोरभाई पाठक यांनी विमानात ध्रूमपान केले. त्याबाबत विमानातील कर्मचारी प्राची लांडगे यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने विमानातील प्रसाधनगृहात धूम्रपान करून स्वत:च्या व अन्य प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सहार पोलिसांनी ठाकोरभाई पाठक यांच्याविरोधात विमान अधिनियमन १९३७ च्या कलम २५ आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल केला.
विमानात धूम्रपान केल्यास काय होते ?
विमानात प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण कमी असते आणि हवेचे पुनर्चक्रण होते. धूम्रपानामुळे लागणारी आग अत्यंत धोकादायक ठरू शकते. केबिनमधील हवा बंद असते, काही प्रवाशांना दमा, ॲलर्जी, किंवा इतर श्वसनविकार असू शकतात. धुरामुळे इतर प्रवाशांमध्ये घबराट, तणाव व अस्वस्थता निर्माण होऊ शकते. धूम्रपानामुळे सर्व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येते. धुरामुळे अलार्म वाजू शकतो, परिणामी, विमान तत्काळ उतरवावे लागू शकते.
कायदा काय सांगतो ?
विमानात धूम्रपान करणे हे हवाई नियमांचे उल्लंघन आहे. भारतात विमान अधिनियम (एअरक्राफ्ट रूल्स) १९३७ नुसार,धूम्रपान केल्यास कारावास आणि दंड होऊ शकतो. काही प्रकरणात १० हजार रुपयांपर्यंत दंड, आणि काही प्रकरणांमध्ये कारावास होण्याची शक्यता असते. अनेक देशांमध्ये हे कृत्य गंभीर फौजदारी गुन्हा मानले जाते. धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाचे नाव ‘उड्डाण नकार यादी’त (नो फ्लाय लिस्ट) टाकले जाऊ शकते. यामुळे तो प्रवासी भविष्यात काही काळासाठी कोणत्याही विमानाने प्रवास करू शकत नाही. अनेक देशांनी १९७३ नंतर विमानात धूम्रपानावर टप्प्याटप्प्याने बंदी आणली. आता सर्वच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांदरम्यान विमानात धूम्रपानावर पूर्ण बंदी आहे.