भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. अनेक दिग्गज मान्यवरांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेत मंगेशकर कुटुंबाचं सांत्वन केलं. यात अभिनेता शाहरूख खानचाही समावेश होता. शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्या. मात्र, यावरूनच शाहरूखवर दुवा देताना थुंकल्याचा आरोप करत ट्रोलिंग करण्यात आलं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोक मुद्दामहून इतरांच्या धर्मावर टीका करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

नाना पटोले म्हणाले, “सर्वांना आपआपल्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याच्या धर्मावर टीका करू नये, असं आपलं संविधान सांगतं. मात्र, काही लोक मुद्दामहून इतरांच्या धर्मावर टीका करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. काही लोकांनी तर इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचं कॉन्ट्रॅक्टच घेतलंय. त्याचाच हा परिणाम आहे.”

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीवर पटोलेंची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची गैरहजेरीवरही नाना पटोले बोलले. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते रविवारी (७ फेब्रुवारी) लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासु वारल्यामुळे मी सुद्धा तिकडे होतो. आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते.”

हेही वाचा : ‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”

“महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात. त्यांनी सर्व ठिकाणी रविवारी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलंय. अस्लम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षा गायकवाड मुंबई बाहेर होत्या. शनिवार रविवारमुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान मोठे आहे. आता थोड्या वेळात मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जातोय,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.