काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील केंद्रीय संस्थांच्या कारवाईचा्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी आधी गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तसेच गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झालं होतं, असाही आरोप केला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याआधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झालं होतं. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण फक्त भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असं सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत असतील त्यांच्यावर कारवाई करायचं षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरं तपासली पाहिजे.”

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नोटबंदीच्या काळात कुणाच्या बँक खात्यात जास्त व्यवहार झाले”

“नोटबंदीच्या काळात कुणाच्या बँक खात्यात जास्त व्यवहार झाले हेही तपासलं पाहिजे. स्वतः भ्रष्टाचारी असताना इतरांच्या घरांवर दगड मारण्याचा प्रकार सुरू आहे. जसं ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि सीबीआयला थांबवलं तसंच महाराष्ट्रातही आम्ही करू. संजय राऊत एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत. लक्ष्य करून भाजपा कारवाई करत असेल तर त्यांना उत्तर देण्याची भूमिका आम्ही महाराष्ट्रात घेऊ,” असंही नाना पटोले यांनी सांगितलं.