‘ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांना सध्या सांत्वनाची गरज आहे. त्यांना कोणत्या तरी पक्षात मन:शांती मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.
नारायण राणे यांच्या बंडखोरीच्या पवित्र्यानंतर बाळासाहेबांना छळणाऱ्यांना महायुतीत प्रवेश नाही, असे ठाकरे म्हणाले होते. त्यावर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मानसिक छळ केला, अशी जळजळीत टीका राणे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या रवींद्र फाटक यांनी ठाण्यातील काँग्रेसच्या सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी या सर्वाचा पक्षप्रवेश झाला. त्यावेळी पत्रकारांनी ठाकरे यांना राणे यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारले. त्यावर ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ठाकरे यांनी पुन्हा तोंड उघडल्यास आणखी गौप्यस्फोट करण्याचा इशारा राणे यांनी दिला होता. ठाकरे यांच्या या खवचट प्रतिक्रियेनंतर राणे कोणती भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री उद्या राणेंना भेटणार
कराड:मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्येच राहणार असल्याची भूमिका घेतलेल्या नारायण राणे यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी भेट घेणार आहेत. कराड दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांना राणेंच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता, त्यांनी सोमवारी राणेंची भेट घेणार असल्याचे सांगितले.तर नारायण राणे यांच्या नाराजीचा काँगेसला फटका बसणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सातारा येथे व्यक्त केले. अन्य पक्षात जाण्याबाबत त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे उत्तरही पवार यांनी दिले.पण या नाराजीचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
राणे यांना सांत्वनाची गरज – उद्धव
‘ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांना सध्या सांत्वनाची गरज आहे. त्यांना कोणत्या तरी पक्षात मन:शांती मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.

First published on: 20-07-2014 at 04:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane needs consolation uddhav reacts to diatribe