scorecardresearch

जे नागपूर सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

जळगावचे, नागपूरचे सगळे गुंड कोणत्या पक्षात आहेत, याचा सर्व्हे करा भाजपचेच नाव समोर येईल.

Narayan Rane
नारायण राणे ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्यात गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात, पण सरकारने गुन्ह्यांची नोंदच केलेली नसल्याचा आरोप करीत काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी मंगळवारी सरकारवर चौफेर टीका केली. विधीमंडळात आज कोपर्डी बलात्कार प्रकरणावर चर्चा सुरू असून, याचर्चेत नारायण राणे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री करतात, अहो तुम्ही गुन्ह्यांची नोंदच केली नाही. जळगावचे, नागपूरचे सगळे गुंड कोणत्या पक्षात आहेत, याचा सर्व्हे करा भाजपचेच नाव समोर येईल. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. जे नागपूर सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असा सवाल उपस्थित करून राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. कोपर्डी बलात्काराचे दुर्देवी प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वेळ नाही. केवळ फसव्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणाऱया मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही नारायण राणे म्हणाले.

वाचा: कोपर्डी बलात्कार प्रकरणाने विधान परिषद दणाणली, मुख्यमंत्री विरोधकांच्या निशाण्यावर

भाजपच्या जाहिरातबाजीवरही राणे यांनी शरसंधान साधले. भाजप सरकारकडून सर्वठिकाणी सुडाचे राजकारण सुरू असून, केवळ जाहिरातील देऊन स्वत:चे प्रतिमासंवर्धन करायचे धंदे सुरू असल्याचे राणे म्हणाले. भाषणबाजी करुन राज्य सुधारणार नाही, धोरणं राबविण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2016 at 15:45 IST